निर्मात्या गुनीत मोंगा यांचा 'पीरियड. एण्ड ऑफ सेन्टेन्स' ठरला ऑस्करविजेता - award
भारतासारख्या विकसनशील देशात महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित विषय अत्यंत गंभीर असूनही त्यावर कौटुंबिक पातळीवर फारशी आस्था दाखवली जात नाही. मात्र, ही समस्या दाखवणाऱ्या माहितीपटाने ऑस्कर पटकावून ही बाब गांभीर्याने घेण्याची आवश्यता असल्याचे अधोरेखीत केले आहे.
नवी दिल्ली- भारतीय फिल्म निर्मात्या गुनीत मोंगा यांचा 'पीरियड एण्ड ऑफ सेन्टेन्स' हा माहितीपट ऑस्करविजेता बनला आहे. महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित जुन्या परंपरा, अंधश्रद्धा, माहितीचा अभाव, याबद्दल उघडपणे बोलणे टाळणे आदी अनेक समस्या आहेत. या सर्व या माहितीपटाच्या निमित्ताने समोर आणल्या आहेत. तसेच, महिलांच्या आरोग्यासाठी 'पॅडस'चा वापर करण्याचा संदेश दिला आहे.
मोंगा यांनी यापूर्वी मसान, लंचबॉक्स आदी दर्जेदार लघुपट बनवले आहेत. या माहितीपटाच्या ट्रेलरमध्ये गावातील मुली, महिलांशी संवाद साधलेला दाखवण्यात आला आहे. तसेच, पुरुषांशीही संवाद साधला आहे. कोणीही यावर धडपणे बोलताना, उघड मत व्यक्त करताना दिसत नाही. महिलांना 'पॅड' म्हणजे काय, हेही माहिती नाही. अत्यंत अस्वच्छ वातावरण, जुन्या कपड्यांच्या चिंध्या यांच्यामुळे मुली आणि महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
ऑस्कर पुरस्कार स्वीकारल्यानंतर माहितीपटाची सर्व टीम भावूक झाली होती. भारतासारख्या विकसनशील देशात महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित विषयांवर आजही माहिती, उपचार किंवा अगदी बोलणेही टाळले जाते. हा विषय अत्यंत गंभीर असूनही त्याविषयी कौटुंबिक पातळीवर फारशी आस्था दाखवली जात नाही. मात्र, ही समस्या दाखवणाऱ्या माहितीपटाने ऑस्कर पटकावून ही बाब गांभीर्याने घेण्याची आवश्यता असल्याचे अधोरेखीत केले आहे. 'अनेक संस्थाही यासाठी काम करत आहेत. आमच्या छोट्याशा प्रयत्नाला कौतुकाची थाप दिल्याबद्दल खूप खूप आभार. मासिक पाळीशी संबंधित समस्यांवर आधारित माहितीपटाने ऑस्कर जिंकून इतिहास रचला,' अशा शब्दांत माहितीपटाच्या निर्मात्यांनी आणि टीमने ऑस्कर अकादमीचे आभार मानले.