लखनऊ -उत्तरप्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे 24 कोटी आहे. मात्र, राज्यात फक्त 6 हजार कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. भाजप सरकारच्या जनसंवाद रॅलीला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
जेव्हा आपण कोरोना रुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी पाहतो. तेव्हा राज्याची स्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येते. सुमारे 24 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात फक्त 6 हजार कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
कोरना काळात आम्ही नागरिकांच्या घरी जाऊन अन्नाची पाकिटे वाटली. स्थलांतरित मजूर सुरक्षितपणे घरी पोहचावे यासाठी आम्ही त्यांची मदत केली. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी लोकांमध्ये सातत्याने जनजागृती केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
योगाला जागतिक स्तरावर ओळख दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही व्हर्चुअल रॅलीत सहभाग घेतला होता. आज आपल्याला सहाव्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे देशवासियांच्या वतीने मी मोदींचे आभार मानतो, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.