नवी दिल्ली - आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या ४० जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधील काळा दिवस आहे.
पुलवामा येथे हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरील दृश्य सीआरपीएफ जवानांच्या ७८ गाड्यांचा ताफा जम्मूवरून श्रीनगरला जात होता. यावेळी पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने आत्मघाती हल्ला केला. यामध्ये महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह राजपूत (४५) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड (३७) या दोन जवानांना देखील वीरमरण आले होते.
बुलडाण्यातील मलकापूर येथील हुतात्मा जवान संजय राजपूत बुलडाणयातील चोरपांगरा येथील हुतात्मा जवान नितीन राठोड हल्ला झाल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेने त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर टाकला होता. यामध्ये आत्मघाती हल्ला करणारा आदिल अहमद दार हा दहशतवादी होता. तो दक्षिण काश्मीरमधील गुंडिबाग येथे राहत होता. तसेच हल्ला झालेल्या ठिकाणापासून त्याचे घर अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर होते. तसेच हल्ल्याच्या काही वेळापूर्वी त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही सांगितले जात होते. या व्हिडिओमध्ये त्याने १ वर्षापासून या हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे कबुल केले होते.
सर्व हुतात्मा जवानांचे पार्थिव श्रीनगर येथून विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावर आणले होते. हल्ला झाल्यानंतर १५ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर संपूर्ण पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हुतात्मा जवानांना वाहिली होती श्रद्धांजली आज केंद्रीय राखीव दलाकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यामध्ये केंद्रीय राखीव दलाचे विशेष महासंचालक झुलफिखार हसन, काश्मीर झोनचे महानिरीक्षक राजेश कुमार यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि इतर सैन्य पुलवामा येथील लेथपोरा सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात श्रद्धांजली वाहणार आहेत. तसेच याठिकाणी रक्तदान शिबिर देखील घेण्यात येणार आहे.