नवी दिल्ली -दिल्लीमधील उत्तम नगरमध्ये कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे भारतात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. संबधित रुग्ण थायलंड आणि मलेशिया देशाचा प्रवास करून नुकताच परतला आहे.
चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने भारतातही आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढून ३१ झाली आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केले असून गर्दी असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे टाळावे, असे आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकामध्ये म्हटले आहे.
१८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. आता परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. N९५ मास्क आणि अन्य वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर १९ आणखी तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एक कॉल सेंटरही उभारण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आम्ही संपर्कात आहोत.
कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्येही मृतांचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियायी देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे.