नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. यातच आज पुन्हा एका शेतकऱ्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. पाला सिंग असे मृत शेतकऱ्यांचे नाव असून ते पंजाबच्या पटियालामधील रहिवासी आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे.
गेल्या सोमवारीही एका शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. मक्खन सिंह असे मृत शेतकऱ्यांचे नाव होते. हे दोन्ही शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंजाबहून दिल्लीला आले होते. आतापर्यंत आंदोलनात 5 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.
आंदोलनाचा आज 21 वा दिवस -
केंद्राच्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 21 वा दिवस आहे. सध्या दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो शेतकरी आंदोलनासाठी ठाण मांडून बसले आहेत. सरकारसोबतच्या आतापर्यंतच्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या असून, कायदे मागे घेण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज दिल्ली-नोएडाची छिल्ला सीमा पूर्णपणे बंद केली आहे.
काय आहेत कृषी कायदे?
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांपैकी पहिल्या कायद्यांनुसार शेतकऱ्याला देशात कोणत्याही ठिकाणी त्याचा कृषीमाल विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तर दुसऱ्या कायद्यानुसार शेतकऱ्याने व्यापाऱ्यासोबत केलेल्या कराराला कायदेशीर मान्यता मिळेल. तसेच तिसऱ्या कायद्यामुळे डाळी, तेल बियाणे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरील निर्बंध दूर झाले आहेत.
हेही वाचा -विशेष अधिकार समितीच्या शिफारशी स्वीकारानंतरच होणार हक्कभंगबाबत कारवाई