रांची -झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज (शनिवारी) मतदान होत आहे. दरम्यान सिसई विधानसभा मतदारसंघामधील बभनी गावांमध्ये गोळीबार झाला आहे. यामध्ये 1 जणाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
झारखंड विधानसभा निवडणूक: मतदानादरम्यान गोळीबार; 1 ठार, 2 जण गंभीर
सिसई विधानसभा मतदारसंघामधील बभनी गावांमध्ये गोळीबार झाला आहे. यामध्ये 1 जणाचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीला गोळीबाराच्या घटनेने हिंसेचे गालबोट लागले. सुरक्षारक्षकांनी मतदान करण्यापासून थांबवल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गोळीबारानंतर काही काळ तेथील मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. गोळीबारामध्ये 25 वर्षीय युवक जिलानी अन्सारी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर तरबेज अन्सारी आणि अशफाक अन्सारी जखमी झाले आहेत. दरम्यान निवडणूक आयोगाने याप्रकरणी अहवाल मागितला आहे.
येत्या ५ जानेवारीला झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे झारखंडमध्ये एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. यापुर्वी ३० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तर १२ डिसेंबरला तिसऱ्या, १६ डिसेंबरला चौथ्या आणि २० डिसेंबरला पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून २३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.