चेन्नई - तामिळानाडूच्या कोईम्बतूरमध्ये आज (रविवार) आयोजित करण्यात आलेल्या जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. तर यावेळी १७ लोक जखमी झाले. यातील एकाची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
पुडुक्कोट्टाई गावातील रहिवासी असलेले सुभाष चंद्र बोस (२४) यांचा या स्पर्धेदरम्यान मृत्यू झाला. बैलाचे शिंग छातीत घुसून झालेल्या जखमेमुळे ते जागीच ठार झाले. तर, मदुराईमधील मुरूगन (37) या व्यक्तीलाही दुसऱ्या एका बैलाचे शिंग घशामध्ये लागून गंभीर इजा झाली आहे.
या स्पर्धेमध्ये साधारणपणे एक हजार बैल, आणि ८२० प्रशिक्षकांनी सहभाग दर्शवला होता. तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री एस. पी. वेलुमणी यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले होते. कोईंबतूर जिल्हा प्रशासन, आणि कोईंबतूर जल्लीकट्टू असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला तेलंगाणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.