मुजफ्फरपूर -बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. नेत्यांकडून राजकीय चिखलफेक सुरू आहे. या दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका सभेत, नितीश कुमार यांच्याविरोधातच घोषणाबाजी करण्यात आली.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए अशी सरळ लढत बिहारच्या राजकीय मैदानात बघायला मिळत आहे. मात्र, त्याचबरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काही महिला उमेदवारही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशात नितीश कुमार रॅली, सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशाच एका सभेदरम्यान, नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मुख्यमंत्री नितीश कुमार कांटी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी, मडवन येथील गांधी जानकी उच्च विद्यालयाच्या मैदानात सभा घेण्यासाठी आले होते. या सभेसाठी ते हेलीकॉप्टरने आले असता, काही कार्यकर्त्यांनी नितीश यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यात त्यांनी 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. यानंतर सुरक्षारक्षकांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सभेच्या ठिकाणावरून बाहेर काढले.