नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी पोखरण येथील अणुचाचणीची आठवण काढत तो भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. तसेच मोदींनी कोरोनाचा पराभव करण्यासाठी संशोधनात आघाडीवर असेल्या सर्व संस्था आणि वैज्ञानिकांचे कौतूक केले आहे.
'तंत्रज्ञानद्वारे आपल्या आयुष्यात सकारात्क बदल घडवणाऱया सर्वांना सलाम. १९९८ साली आपल्या वैज्ञानिकांनी केलेली कामगिरी हा भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण होता, असे ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे.
सध्या कोरोनापासून जगाला मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होत आहे. कोरोना विषाणूवर संशोधन करून त्याचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणाऱया सर्व संस्था आणि योद्ध्यांना मी नमन करतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
भारतामध्ये ११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९८ साली याच दिवशी भारताने पोखरण अणुचाचणी करून जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. पोखरण अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' असे नाव देण्यात आले होते. फक्त अणुतंत्रज्ञानच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील भारताची तंत्रज्ञानातील प्रगती या दिवशी अधोरेखीत केली जाते. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची कल्पना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व प्रथम मांडली.