मॉस्को - पाकिस्तानला शस्त्र पुरवठा करणार नाही, या धोरणाचा रशियाने पुनरुच्चार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने तशी विनंती केली होती. त्यानंतर रशियाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. शाघांई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला गेले आहेत. यावेळी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गी शोयगू यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत रशियाने या धोरणाचा पुनरुच्चार केल्याचे सुत्रांकडून समजले आहे.
एससीओच्या बैठकीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सिंह आणि सेर्गी यांच्यात सुमारे एक तास बैठक झाली. संरक्षण, सुरक्षा या विषयांसह द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संरक्षण आणि सामरिकदृष्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये सखोल चर्चा झाल्याचे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.