नवी दिल्ली -छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील मेनपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात एका वृद्ध व्यक्तीला आपल्या मुलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेण्यासाठी लाच द्यावी लागल्याची घटना घडली. याप्रकरणी मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी (सीडीएमओ) यांनी घटनेची चौकशी करून जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
छत्तीसगडमधील एक तरुण 24 जुलैला मृत अवस्थेत आढळला. त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टसाठी वडिल रुग्णालयात गेले. तेव्हा त्यांना रुग्णालयाच्या सफाई कर्मचाऱ्याने लाच मागितली. मुलाचा पोस्टमार्टम अहवाल मिळविण्यासाठी आपल्या लहान मुलाची दुचाकी तारण ठेवली आणि ते पैसे सफाई कर्मचाऱ्याला दिल्याचे मृताच्या वडिलांनी सांगितले. ही वृद्ध व्यक्ती गरियाबंदमधील चलनापदार गावातील रहिवासी आहे.
मुलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हवा असेल, तर पैसे द्या. ते पैसे डॉक्टरांना दिल्यानंतरच अहवाल मिळेल, असे म्हणत सफाई कर्मचाऱ्याने पैसे मागितले. मी खूप गरीब आहे आणि मी तुला पैसे देऊ शकत नाही, असे सांगितल्यावर त्याने मला फटकारले आणि मुलाचा रिपोर्टही दिला नाही. अनेक तास थांबल्यानंतर माझ्या लहान मुलाने मोटारसायकल गहाण ठेवून त्या सफाई कामगारला 4 हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट माझ्याकडे दिला, असे मृताच्या वडिलांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रमोद पोरती या युवकाचा कुजलेला मृतदेह 24 जुलैला गरियाबंद जिल्ह्यातील देवभोग पोलीस हद्दीतील चलनापदार गावात एका तलावाजवळ सापडला होता. प्रमोदच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, तरी त्या युवकाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.