भुवनेश्वर - राज्यात आणखी एक एम्स रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी ओडिशा सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. सुंदरगड जिल्ह्यात एम्स उभारण्यात यावे, अशी मागणी असलेले पत्र मुख्य सचिव असीत त्रिपाठी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला लिहिले आहे. बिहार राज्यात दुसऱ्यांदा एम्स रुग्णालय स्थापन करण्यात येत असल्याची माहिती आहे. याचप्रकारे इतर राज्यातही एम्स रुग्णालये उभारण्यात यावे, असा प्रस्ताव आहे. त्यामुळे ओडिशामधील आरोग्य समस्या लक्षात घेता, पश्चिम ओडिशामधील सुंदरगड जिल्ह्यात दुसरे एम्स उभारले जावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वार केली आहे.
सुंदरगड जिल्ह्यामध्ये महाविद्यालय व रुग्णालयासाठी पायाभूत सुविधा आहेत. सीएसआर पुढाकाराने ओडिशा सरकार आणि एनटीपीसी यांच्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर, उपकरणे खरेदी सुरू आहे. 500 बेड आणि महाविद्यालयात एमबीबीएसच्या 100 जागा असलेला हा प्रकल्प आहे. त्यामुळे कमी वेळात एम्स उभारण्यासाठी याची मदत होईल. जिल्ह्यात एम्स उभारल्यास त्याचा फायदा जिल्ह्यातील आदिवासी आणि मागास लोकांना होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.