मयूरभंज -ओडिशात रुग्णवाहिकेतील इंधन संपल्याने गर्भवतीला जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. या गर्भवती महिलेची तब्येत खालावल्यामुळे तिला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, तिला रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच रुग्णवाहिकेतील इंधन संपल्यामुळे तिला जीव गमवावा लागला. बारीपाडा या निमशहरी भागात हा प्रकार घडला.
या महिलेला शुक्रवारी रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. तिला आधी बंगिरीपोशी येथील रुग्णालयात (बंगिरीपोशी कम्युनिटी हेल्थ सेंटर) दाखल करण्यात आले होते. नंतर प्रकृती गंभीर झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला बारीपाडा येथील पंडित रघुनाथ मुर्मू वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (पीआरएमएमसीएच) दाखल करण्याचा सल्ला दिला. येथे नेण्यात येत असताना रस्त्यात रुग्णवाहिकेतील इंधन संपले. यानंतर दुसरी रुग्णवाहिका मागवण्यात आली मात्र, ती तब्बल ४५ मिनिटांनी तेथे पोहोचली. यादरम्यान, या महिलेचा मृत्यू झाला.
तुलसी मुंडा असे या महिलेचे नाव असून ती हांडा या गावची रहिवासी होती. तिचे पती चित्तरंजन मुंडा यांनी या घटनेविरोधात तक्रार नोंदवली आहे. 'रुग्णवाहिकेत इंधन कमी असताना किंवा ती नादुरुस्त असताना तिच्यातून रुग्णाला नेणे हा त्याच्या जिवाशी खेळ आहे. असा बेजबाबदार कारभार करणारे रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी,' अशी मागणी मृत महिलेच्या पतीने केली आहे.