लखनौ - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे भारतात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली आहे.
चीनमध्ये भयानक रूप धारण केलेल्या कोरोना विषाणूने भारतातही आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढून 30 झाली आहे. यामध्ये इटलीच्या १६ नागरिकांचाही समावेश आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राज्यसभेमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात करण्यात आलेल्या तयारीवर उत्तर दिले. ते म्हणाले, १८ जानेवारीपासून देशात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. चीन, जपान, हाँगकाँग, नेपाळ, व्हिएतनाम, सिंगापूर, थायलंड या देशातील नागरिकांची पहिल्यापासूनच तपासणी करण्यात येत आहे. आता परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. N९५ मास्क आणि अन्य वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. तपासणीसाठी १५ प्रयोगशाळा तयार ठेवण्यात आल्या आहेत. तर १९ आणखी तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी एक कॉल सेंटरही उभारण्यात आले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आम्ही संपर्कात आहोत.
हेही वाचा :राज्यसभेत देशातील कोरोना संसर्गावर चर्चा, आरोग्य मंत्री म्हणाले...