नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 684 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 37 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 23 हजार 77 झाला आहे, यात 17 हजार 610 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 4 हजार 749 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 718 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 6 हजार 430 कोरोनाबाधित असून 283 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 683 कोरोनाबाधित असून 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 2 हजार 624 कोरोनाबाधित असून 112 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 376 कोरोनाबाधित तर 50 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ राजस्थानमध्येही 1 हजार 964 कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक नागरिकही आपापल्यापरिने या कामासाठी मदत करत आहेत. तसेच या महामारीचा सामना करताना केंद्र सरकारवरील आर्थिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खर्चांमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2021 पर्यंत न वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.