लखनऊ - देशभराप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या हिवाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानंतर विद्यापीठाचे कामकाज ५ जानेवारीला सुरू होईल. सर्व परीक्षादेखील त्यानंतरच आयोजित केल्या जातील, अशी माहिती विद्यापीठाचे रजिस्ट्रार अब्दुल हमीद यांनी दिली आहे.
काही वेळापूर्वी पोलीस आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे विद्यार्थी यांच्यामध्ये झटापट झाली होती. पोलिसांनी विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला होता. याबाबत बोलताना हमीद म्हणाले, की काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर विद्यापीठातील वातावरण गंभीर आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती केली आहे.