अमरावती -आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्यात एनआरसी लागू होणार नाही, अशी सोमवारी घोषणा केली. काडपा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी मुस्लीम समाजाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमादरम्यान, मुस्लिम समाजाच्या काही नेत्यांनी एनआरसीबाबत चिंता व्यक्त केली. त्याला उत्तर म्हणून; नागरिकत्व नोंदणीचा आम्ही विरोध करत आहोत. राज्यातील अल्पसंख्यांकांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, याची मी खात्री देतो, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की राज्याचे उपमुख्यमंत्री अमजथ बाशा यांनी याआधीच एनआरसीबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आमचा नक्कीच त्याला विरोध आहे, त्यामुळे राज्यात एनआरसी लागू होणार नाही असा विश्वास मी सर्व मुस्लिम बांधवांना देतो.
त्याआधी रविवारी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जगनमोहन यांना, कॅब आणि एनआरसीबाबत केंद्रसरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. माझे मित्र जगनमोहन रेड्डी यांना मी अशी विनंती करतो, की त्यांनी केंद्राला असलेल्या आपल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करावा. आपल्याला देश वाचवायचा आहे, असे वक्तव्य ओवैसी यांनी हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या एका रॅलीमध्ये केले होते.
दरम्यान, रेड्डींच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने संसदेमध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते, तर तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षाने त्याला विरोध दर्शवला होता.
हेही वाचा : लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र