गुवाहाटी - आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. भारतीय नागरिकत्त्वाच्या यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश करण्यात आला आहे. तर १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना यातून वगळण्यात आले आहे. ज्या लोकांचा या यादीमध्ये समावेश झाला नाही, त्यांना नागरिकत्त्व सिद्ध करण्याची संधी देण्यात येणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणी अधिकारी प्रतिक हजेला यांनी या बाबतची माहिती दिली.
जे लोक या यादीतून वगळले गेले असतील त्यांना परदेशी नागरिक लवादात दाद मागण्याची संधी देण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या ५१ तुकड्या राज्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जनतेला घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे.
ज्या लोकांची नावे यादीमध्ये नाहीत त्यांनी घाबरुन जाण्यीची गरज नाही. भारतीय नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाची यादीत नाव नसणाऱ्यांना संधी दिली जाईल, तसेच कायदेशीर प्रक्रियेनंतरच यावर निर्णय घेतला जाईल त्यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री सोनोवाल यांनी जनतेला केले आहे.
हेही वाचा - आसाममध्ये कार आणि बसच्या अपघातात ४ वन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू