नवी दिल्ली -देशात कोलकाता, बिहार, मुंबई आणि हैदराबाद याठिकाणी कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या सर्वांना विशेष देखरेखीखाली ठेवले गेले आहे. चीनमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. तसेच, चीनबाहेरही अनेक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या विषाणूवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे हा अधिक धोकादायक मानला जातो आहे.
कोलकातामध्ये आज एका चिनी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना विषाणूची त्याला लागण झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या त्याच्यावर स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
तर, मुंबईमध्येही कोरोनाचा चौथा संशयित रुग्ण आढळून आला आहे. अभिषेक बाफना या ३६ वर्षीय तरुणाने चीनचा प्रवास केला होता. त्यानंतर आता कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मुंबईमध्ये तीन संशयित रुग्ण आढळून आले होते. त्या तिघांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले. तरीही केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार या सर्वांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले गेले आहे.
तेलंगाणामध्ये, चीनवरून हैदराबादला आलेल्या एका तरुण डॉक्टरला सर्दी आणि खोकला असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या लक्षणांपैकी ही लक्षणे असल्यामुळे या रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, रविवारी आणखी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना इतर रुग्णांपासून दूर, स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.