- जाफराबादमधील रस्ते बंद करण्यात आले असून, पोलिसांना 'शूट अॅट साईट'चे निर्देशही देण्यात आले आहेत.
- दिल्लीच्या उत्तर-पूर्व भागातील सीबीएसई बोर्डाचा उद्याचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.
- कालपासून सुरू असलेल्या या हिंसाचारमध्ये आतापर्यंत तेरा लोकांचा मृत्यू झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गाझियाबादकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत.
- उत्तर-पूर्व दिल्लीमधील शाळा बुधवारी राहणार बंद, सीबीएसई बोर्डाला उद्याचा पेपर पुढे ढकलण्याची केली विनंती - उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची माहिती.
- आयपीएस एस.एन. श्रीवास्तव यांची दिल्ली पोलिसांत विशेष आयुक्त म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात आली.
- हुतात्मा रतनलाल यांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले आहे. राजस्थानमधील बुराडी या गावात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शेकडो लोक उपस्थित आहेत. इथून त्यांचे पार्थिव हे त्यांच्या मूळ गावी नेण्यात येईल. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात असणाऱ्या या गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
- दिल्लीतील हिंसाचाराबाबत बोलताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी म्हटले, की जे 'भारत माता की जय' म्हणणार नाहीत, त्यांनी भारतात राहू नये. जे कोणी भारताला विरोध करेल, संवैधानिक व्यवस्थांचा वारंवार अनादर करेल, त्या लोकांबाबत आम्हाला विचार करावा लागेल. ते पुढे म्हणाले, की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
- जाफराबाद, चांद बाग, करावल नगर आणि मौजपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली नाही.
- हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गाजियाबादमधील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
- उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये हिंसाचार सुरूच, चांदबाग परिसरात जाळपोळ..
- दिल्लीतील गुरू तेज बहादुर (जीटीबी) रूग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये हिंसाचारामध्ये आपले प्राण गमावलेल्या लोकांची संख्या १० वर पोहोचली असून, यात १५०हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
- दिल्लीमधील हिंसाचारात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, १३५हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जीटीबी रूग्णालयात दाखल होणाऱ्या जखमींची संख्या वाढतच चालली आहे, अशी माहिती रूग्णालयाचे एमएस सुनील यांनी दिली. सोमवारी सुरू झालेल्या या हिंसाचारामध्ये कालपर्यंत पाच लोकांनी आपले प्राण गमावले होते, तर आज आतापर्यंत आणखी चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
- खजूरी खास परिसरात पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात. कलम १४४ही लागू करण्यात आले.
- दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांना मानवंदना देण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, आणि दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक हे उपस्थित आहेत. रतन लाल यांनी काल (सोमवार) दिल्लीतील हिंसाचारामध्ये आपले प्राण गमावले होते.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हिंसाचारात जखमी झालेल्यांची रूग्णालयात भेट घेतली.
-
भजनपूरा चौकात पुन्हा दगडफेकीला सुरुवात..
- दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत - दिल्ली नायब राज्यपाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक, मंत्र्यासह आमदारही उपस्थित
- दिल्ली हिंसाचार: पोलीस शिपायासह 9 जणांचा मृत्यू; काही भागांत महिनाभर संचारबंदी
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची घटना चिंताजनक आहे. अनेक पोलीस आणि नागरिक जखमी झाले असून काहीजणांचे प्राणही गेले आहेत. घरांना आणि दुकानांना आगी लावण्यात आल्या आहेत. - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
-
मौजपूर, ब्रम्हापूरी भागात आज सकाळी पुन्हा दगडफेक
- हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी १२ वाजता बोलावली सर्वपक्षीय बैठक, अरविंद केजरीवालांसह दिल्लीचे नायब राज्यपाल राहणार उपस्थित
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचारात आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १७० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. एक पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि बारा नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. ईशान्य दिल्लीतील सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.
आंदोलकांना नियंत्रणात आणताना अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. जाफराबाद, बाबरपुरी, गोकुलपुरी, जौहरी एनक्लेव्ह आणि शिव विहार येथील मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहेत. काल एका आंदोलकाने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.