स्टॉकहोम- यावर्षीचे साहित्यातील नोबेल पारितोषिक अमेरिकेतील कवयित्री लुईस ग्लुक यांना जाहीर झाले आहे. ग्लुक यांनी १९६८ साली लिखाणाला सुरुवात केली. 'फर्स्टबॉर्न' हा त्यांचा पहिला कविता संग्रह १९६८ साली प्रसिद्ध झाला होता. बालपण, कौंटुबीक जीवन, भावंडे आणि पालकांमधील जिव्हाळ्याचे संबंध या विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे.
पहिल्या कवितासंग्रहानंतरच साहित्यविश्वात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. ग्लुक यांचे आत्तापर्यंत ११ कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यासोबतच कविता या साहित्य प्रकारावर त्यांनी निबंधमालाही लिहल्या आहेत. स्विडीश अॅकॅडमीने आज नोबेल पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
१९९३ साली पहिल्यांदा साहित्यातील नोबेल टोनी मॉरिसन यांना जाहीर झाला होता. नोबेल जिंकणाऱ्या आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या त्या पहिल्याच महिला होत्या.
२०१८ साली स्विडीश अॅकॅडमीवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळे साहित्यातील नोबेलचे यावर्षी वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे संघटनेवर टीकाही झाली होती. त्यानंतर २०१९ साली नोबेल समितीने दोन साहित्यातील नोबेल जाहीर केले होते.
२०१८ साली पोलंडचे ओल्गा टोकरुक आणि २०१९ साली ऑस्ट्रियाचे पीटर हैंडके यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. यातील हैंडके यांना नोबेल जाहीर झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. १९९० साली बाल्कन युद्धादरम्यान हैंडके यांना सर्बियाचे समर्थक मानण्यात येत होते. त्यामुळे सर्बिया युद्ध गुन्ह्यांवरुन हैंडके यांनी माफी मागावी अशी मागणी अनेकांनी केली होती. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली होती.
अल्बानिया, बोस्निया आणि तुर्कस्तानसह अनेक देशांनी २०१९ नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. तर नोबेल वितरण समितीतील एका सदस्याने राजीनामा दिला होता.