स्टॉकहोम - शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिक जागतिक अन्न कार्यक्रमाला (World Food Programme) जाहीर झाले आहे. 'जागतिक अन्न कार्यक्रम' ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या अतंर्गत काम करते.
जागतिक अन्न कार्यक्रमाने भूकेविरोधात मोठी लढाई दिली आहे. जगात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. 2019मध्ये जागतिक अन्न कार्यक्रमाने 88 देशातील 100 कोटी लोकांना मदत केली आहे. प्रभावीत क्षेत्रात भुकेविरोधात लढण्यसाठी आणि शांती कायम ठेवण्यात या कार्यक्रमाने भूमिका बजावली आहे. जागतिक भूकेच्या प्रश्नांकडे लक्ष वळवण्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाला हे पारितोषिक देण्यात आले आहे.
6 ऑक्टोबरला भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले. भौतिकशास्त्रातील 2020चे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले आहे. रॉजर पेनरोझ, रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रेया गेझ अशी पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांची नावे आहेत. तर 7 ऑक्टोबरला रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौदना यांना जिनोम एडिटिंगसाठी (गुणसtत्रांत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया) नवी पद्धती विकसित केल्याबद्दल देण्यात आले. तर 8 ऑक्टोबरला यावर्षीचे साहित्यातील नोबेल पारितोषिक अमेरिकेतील कवयित्री लुईस ग्लुक यांना जाहीर झाले.