नवी दिल्ली - 'नो येस बँक' असे म्हणत, काँग्रेस नेते राहुल गांधींनी सरकारवर टीका केली आहे. नरेंद्र मोदींच्या 'युक्त्यांमुळे' देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मोदींवर हा हल्ला केला.
आरबीआयने दिलेल्या निर्देशांनुसार, गुरुवारपासून येस बँकेवर निर्बंध लादण्यात आले. बँकेवर असणाऱ्या कर्जाच्या बोजामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरबीआयने दिली. या निर्बंधांनुसार, या बँकेच्या खातेदारांना केवळ ५० हजारांपर्यंतची रक्कम आपल्या खात्यातून काढता येणार आहे. एका महिन्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
यासोबतच, या एका महिन्यासाठी येस बँक कोणालाही नवे कर्ज देऊ शकणार नाही, किंवा कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची बँकेच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.
आरबीआयने येस बँकेच्या खातेदारांना ही हमी दिली आहे, की त्यांचे पैसे हे खात्यामध्ये सुरक्षित आहेत. या निर्णयानंतर खातेदारांनी आपापल्या खात्यामधील पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावल्या होत्या. बँकेने याआधी कोणतीही सूचना न दिल्यामुळे, तसेच एटीएममध्येही पैसे उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरला होता.
हेही वाचा :दिल्लीमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण, देशातील एकूण संख्या ३१ वर..