नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात असणाऱ्या ठरावावर, आज (गुरुवार) युरोपीय संसदेमध्ये मतदान होणार होते. मात्र, आता युरोपीय महासंघाने हे मतदान पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे द्विपक्षीय चर्चेसाठी ब्रुसेल्सला जाणार आहेत. हा दौरा अडचणीत येऊ नये, यासाठी महासंघाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आता हे मतदान २ मार्चला सुरू होणाऱ्या संसदेच्या नव्या सत्रामध्ये घेतले जाणार आहे.
मतदानाची तारीख पुढे ढकलणे हा आपला एकप्रकारे विजय असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. भारताच्या मित्रराष्ट्रांनी पाकिस्तानच्या मित्रराष्ट्रांवर मिळवलेला हा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करणाऱ्या ठरावाविरोधात मतदान करण्याबाबत मन वळवण्यासाठी, बलाढ्य अशा ब्लॉकमधील जवळपास सर्वच देशांसोबत भारताने चर्चा केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानाआधी युरोपीय संसदेचे सभासद हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत सीएए संदर्भात थेट चर्चा करतील, असे ठरल्यानंतर त्यांनी मतदान पुढे ढकलण्यास मान्यता दिली. जयशंकर हे थोड्याच दिवसांमध्ये ब्रुसेलसचा दौरा करणार आहेत. मार्च महिन्यामध्ये होत असलेल्या मोदींच्या दौऱ्याची पूर्वतयारी करण्यासाठी जयशंकर ब्रुसेलसला जाणार आहेत. यासोबतच, भारताचे सर्वोच्च न्यायालय सीएए बाबत काय निर्णय देते, हेही युरोपीय महासंघाला पहायचे आहे.