गेल्या 10 महिन्यांपासून संपूर्ण जग एकत्रितपणे कोविड-19 सारख्या महाभंयकर विषाणूशी लढा देत आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे झालेले मृत्यूच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा असलेल्या राष्ट्रांपासून ते भारतासारख्या जेमतेम सुविधा असणाऱ्या सर्वच देशांमध्ये कोरोना महामारीने विद्यमान आरोग्य यंत्रणेतील कमतरता चव्हाट्यावर आणल्या आहेत. तसेच जगभरात ज्या वेगाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेला, अगदी त्याच वेगात विकसनशील देशांची कोविड व्यतिरिक्त इतर आरोग्य सुविधांसाठी वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी धडपड सुरू झाली.
खरं तर, लॅन्सेटने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात कोरोनापेक्षा जास्त गंभीर असणारे इतर 15 आजार आढळले आहेत. यातील प्रत्येक आजारामुळे दरवर्षी किमान 10 लाख लोकांचा मृत्यू होतो. या अभ्यासाने, आपल्या सध्याच्या आरोग्य सेवा धोरणात सुधारणा करण्याची किती गरज आहे? हे अधोरेखित केले आहे.
हृदयासंबंधीत आजार (1.78 कोटी), कर्करोग (96 लाख), मूत्रपिंडाचे रोग (12 लाख) आणि क्षयरोग (11 लाख) आदी आजारांमुळे जगभरात दरवर्षी साधारणतः 4.43 कोटी लोकांचा मृत्यू होतो. या रोगांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय सुविधा बऱ्याच ठिकाणी कमी दर्जाच्या आहेत. कोवीड- 19 महामारी उद्भवल्यानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीतच, जगभरातील 2.84 कोटी शस्त्रक्रिया (भारतातील 5.8 लाख शस्रक्रिया धरुन) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे यावर्षी 16.6 लाख लोकं क्षयरोगाचे बळी पडू शकतात, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या इशाऱ्यानंतरही परिस्थिती बदलेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.