नवी दिल्ली -दिल्लीतील आभाळ आता स्वच्छ झाले आहे, त्यामुळे ऑड-इव्हन योजनेची आता गरज नसल्याचे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. दिल्लीमधील एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
दिल्लीतील हवेचा स्तर हा केवळ ११ ठिकाणी केलेल्या परिक्षणांवरून ठरवणे चुकीचे असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. ज्या ११ ठिकाणांवरून हवेचे नमुने गोळा केले आहेत, त्या जागा कोणत्या आहेत हे पाहणेही आवश्यक आहे.
दिल्लीमधील प्रदूषण प्रश्न गंभीर झाल्यामुळे ४ ते १५ नोव्हेंबरपर्यंत दिल्लीमध्ये सम-विषम योजना लागू करण्यात आली होती. दिल्लीमध्ये ही योजना लागू करण्याची ही तिसरी वेळ होती. याआधी २०१६ मध्ये दोन वेळा ही योजना लागू करण्यात आली होती. तर, प्रदूषणप्रश्नी ही योजना खरोखरच उपयोगी आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला होता.
दरम्यान, दिल्लीमधील प्रदूषण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी झाले असल्याने, राज्यातील शाळादेखील पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, अजूनही दिल्लीतील हवा ही धोकादायक पातळीवरच आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज भासत आहे.
हेही वाचा : जेएनयू विद्यार्थी परिषदेचा संसदेवर मोर्चा; पोलिसांनी विद्यार्थ्यांना रस्त्यातच रोखले