नवी दिल्ली - रविवारी (१९ मे) लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झीट पोल येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आज दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांबरोबर कोणतीही बैठक करणार नाहीत, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मायावतींची आज दिल्लीत कोणतीही बैठक नाही - सतिशचंद्र मिश्रा - nda
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आज दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांबरोबर कोणतीही बैठक करणार नाहीत, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
मायावती आज (सोमवारी) विरोधी पक्ष नेत्यांबरोबर बैठक करणार असल्याच्या बातमीनंतर बसपाकडून ही माहिती देण्यात आली. बसपा नेते सतिशचंद्र मिश्रा यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे. याअगोदर काही माध्यमांनी २३ मे रोजी असलेल्या लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मायावती दिल्लीत यूपीए प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर बैठक करणार असल्याची बातमी दिली होती.
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लखनौ येथे शनिवारी मायावतींची भेट घेतली होती. यानंतर रविवारी विविध माध्यमांचे देशभरातील निवडणुकांनतरचे एक्झिट पोल जाहीर झाले. ज्यामध्ये केंद्राची सत्ता पुन्हा एनडीए प्रणीत भाजप सरकारकडेच जाणार असल्याचे दाखवले गेल्याने, नव्या राजकीय डावपेचांना सुरूवात झाल्याचे दिसत आहे. यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची दिल्ली वारी वाढली आहे.