नवी दिल्ली -बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अशात, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीनंतर राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याची तयारी केली असल्याचा दावा लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाल्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे.
चिराग पासवान यांनी काही तासांपूर्वी एक ट्विट केले आहे. नितीश कुमार यांना दिलेले मत हे फक्त बिहारला कमकुवत करणारे नाही तर ते आरजेडी आणि महाआघाडीला मजबूत करेल. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाला सोडून आरजेडीसोबत जाण्याची तयारी केली आहे. याआधी त्यांनी आरजेडीच्या आर्शिवादाने सरकार बनवले आहे, असे ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बिहार १५ वर्षांआधी बदनाम होते. त्यानंतर आता बिहार वाईट अवस्थेत आहे. आता तुमच्या साथीने बिहारला नितीशमुक्त करुन नंबर वन करायचे आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनला दलापेक्षा अधिक जागा लोक जनशक्ती पक्ष लढवत आहे. आम्ही नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकून भाजपा-लोक जनशक्ती पक्षाचे सरकार स्थापन करू, असे चिराग पासवान यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील ७१ जागेसाठी आज मतदान होत आहे. यात दोन कोटींहून अधिक नागरिक १ हजार ६६ उमेदवारांमधून आपले आमदार निवडतील. कोविड काळात पहिल्यांदाच मतदान होत असून यात किती मतदार आपला हक्क बजावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.