नवी दिल्ली - नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर दंडाची रक्कम दणदणीत झाली आहे. यावरून लोकांमध्ये सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे. याविषयी बोलताना केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. 'एवढ्या मोठ्या प्रमाणात लागू करण्यात येत असलेली दंडाची रक्कम लोकांचे जीव वाचावेत म्हणूनच आहे. यामागे सरकारी तिजोरी भरण्याचा उद्देश नाही. लोकांमध्ये कायद्याविषयी धाक आणि आदर निर्माण होणे आवश्यक आहे,' असे गडकरी म्हणाले.
'लोकांचा जीव वाचवण्याची जबाबदारी सरकारची नाही का? या कायद्यामागे हीच भावना आहे. यामागे सरकारी तिजोरी भरण्याचा उद्देश नाही. शिवाय, आपण रस्ते अपघातांमुळे दोन टक्के जीडीपी गमवत आहे,' असे ते म्हणाले. 'प्रत्येक वर्षी रस्ते अपघातात दीड लाख लोक मारले जातात. यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण ६५ टक्के आहे. मात्र, यासाठी सर्व राज्यांचे सहकार्य हवे आहे. हे सर्व राज्य सरकारे आणि पक्ष बाजूला ठेवून एकत्र येऊन केले पाहिजे,' असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, नव्या मोटार कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती देण्यात आल्याचे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले आहे.
हेही वाचा - मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती विजया के. ताहिलरमाणी यांचा राजीनामा