नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि वरिष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांची आज दिल्लीत बैठक झाली. जवळपास अर्धा तास ही बैठक चालली. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष पेटलेला असताना या दोघांच्या भेटीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पटेल हे काँग्रेसमधील आणि गडकरी हे भाजपमधील ज्येष्ठ व मुरब्बी नेते मानले जातात. परस्परविरोधी पक्षांमधील या मोठ्या नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बैठक संपल्यानंतर पटेल यांना गडकरींशी झालेल्या चर्चेविषयी विचारले असता 'आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तसेच, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीही काही बोलणे झाले नाही. आमची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली,' असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राज्यात मोठ्या घडामोडीची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र, आमच्यात काहीही ठरलेले नाही, असे पवारांनी म्हटले होते. आता पटेल यांनीही गडकरींशी झालेल्या चर्चेविषयी काही विशेष खुलासा केला नाही. यामुळे उलट-सुलट चर्चांना ऊत आला आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे निकाल लागून १४ दिवस उलटले तरी राज्यात सत्ता स्थापनेबाबत कोणतीही हालचाल झाली नाही.
दुसऱ्या बाजूला शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, यात काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली नसून अशी आघाडी होणेही तितकेच कठीण आहे. आता पटेल यांनी गडकरींची भेट घेतल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.