सोलापूर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज (गुरुवार) सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी हजर होते. यावेळी समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली.
सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींना आली भोवळ - सोलापूर
आज (गुरुवार) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १५ व्या वर्धापन दिनासाठी गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सांगतेवेळी सुरू असलेल्या राष्ट्रगीतादरम्यान गडकरींना भोवळ आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे
सकाळी बाराच्या सुमारास नितीन गडकरी यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले. आगमनानंतर भाजप पदाधिकाऱ्याचा सत्कार स्वीकारुन ते सोलापूर विद्यापीठात आयोजित कार्यक्रमस्थळी पोहोचले. कार्यक्रमावेळी सुरू असलेल्या राष्ट्रगीतावेळी त्यांना भोवळ आली. मात्र, गडकरी राष्ट्रगीत सुरू असेपर्यंत उभे राहिले. राष्ट्रगीत संपल्यावर गडकरी खुर्चीवर बसले. मात्र त्यावेळी गडकरींची प्रकृती बिघडल्याचे पाहून सहकार मंत्री सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि कुलगुरु मृणालिनी फडणवीस यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. सध्या गडकरी यांना कुलगुरुंच्या घरी हलविण्यात आले आहे.
याआधीही ७ डिसेंबर २०१८ रोजी राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नितीन गडकरी यांना स्टेजवर अचानक भोवळ आली होती. गडकरी स्टेजवर कोसळत असल्याचे पाहून राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले होते. तर, यावर्षी २७ एप्रिलला शिर्डी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारादरम्यान गडकरींना भोवळ आली होती.