नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही स्थलांतरीत मजुरांची भेट घेतली होती. त्यावरून अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी राहुल गांधीच्या स्थलांतरीत मजुरांच्या घेतलेल्या या भेटीला ड्रामेबाजी म्हटलं आहे. तसेच स्थलांतरीत मजुरांप्रती असेलली जबाबदारी समजून घ्यावी आणि तसे वागावे, अशी विनंती त्यांनी सोनिया गांधींनाही केली.
ते आम्हाला ड्रामेबाज म्हणतात, मी त्याच्याच शब्दात सांगते, त्यांनी मजुरांना थांबवून त्यांच्याशी चर्चा केली. ही असे काही करण्याची वेळ आहे का, ही ड्रामेबाजी नाही का? असे सितारमण म्हणाल्या.
राहुल गांधी यांनी कामगारांसमवेत बसून त्यांच्याशी बोलण्यात आपला वेळ वाया घालवला. त्यांनी कामगारांचे सामान उचलून त्यांच्याबरोबर पायी चालत जायला हवे होते, असे अर्थमंत्री म्हणाल्या. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. त्या राज्यांना कामगारांना घरी पोहचवण्याचे का सांगितले जात नाही. मी सोनिया गांधींना विनंती करते, की त्यांनी स्थलांतरित मजुरांचा मुद्दा जबाबदारीपूर्वक हाताळला पाहिजे, असेही अर्थमंत्री म्हणाल्या.
लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना घरी जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुखदेव विहार फ्लायओव्हर परिसरामध्ये असलेल्या काही स्थलांतरित कामगारांशी जवळपास तासभर चर्चा केली होती.