नवी दिल्ली -दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल राजघाटावर आमरण उपोषणाला बसल्या आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांनी आपण कडाक्याच्या थंडीत या उपोषणाला बसल्याचे सांगून अत्याचार पीडित महिलांच्या समस्यांपुढे आपली ही समस्या काहीच नसल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी जास्तीत जास्त लोकांना या आंदोलनात आपल्यासोबत उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
महिला अत्याचाराविरोधात स्वाती मलिवाल यांचे आमरण उपोषण, निर्भयाच्या आई-वडिलांचे समर्थन आज मलिवाल यांना भेटण्यासाठी निर्भयाचे आई-वडील राजघाटावर पोहोचले. त्यांनी मलिवाल यांना त्यांच्या आंदोलनाला समर्थन देत असल्याचे सांगितले. त्यांनी मलिवाल यांची चौकशीही केली. मात्र, त्यांनी मीडियापासून दूरच राहणे पसंत केले. त्यांनी मीडियाशी बोलणार नसल्याचे सांगितले.
आमरण उपोषणाला बसलेल्या स्वाती मलिवाल यांना समर्थन देण्यासाठी केवळ दिल्लीच नाही तर, आजूबाजूच्या राज्यांमधूनही लोक राजघाटावर पोहोचले आहेत. बुधवारीही सायंकाळी हजारो विद्यार्थी स्वाती मलिवाल यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी राजघाटावर आले होते. हे सर्व विद्यार्थी मुखर्जी नगरात यूपीएससी, एसएससी आदी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. हे सर्व विद्यार्थी पायी चालत मोर्चा घेऊन राजघाटावर पोहोचले होते.
काल (बुधवार) राजघाटावर पोहोचलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वाती यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. त्यांनी बलात्काराच्या आरोपींना ताबडतोब शिक्षा मिळावी यासाठी कायदा बनावा, अशी जोरदार मागणी केली. यादरम्यान सरकारने महिला सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. तसेच, अशी पावले लवकर न उचलली गेल्यास निषेध आंदोलन संसदेपर्यंत पोहोचेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.