नवी दिल्ली- निर्भयाच्या आई या काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, आता त्यांनीच पुढे येत यामध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मला राजकारणात काहीही रस नाही. काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यासोबत माझी कसलीच चर्चा झाली नाही. मला फक्त माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे, आणि आरोपींना शिक्षा झालेली पहायचे आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निर्भयाच्या आई होणार काँग्रेसमध्ये सामील?
निर्भयाच्या आई या काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत, आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उभ्या राहणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यातच काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनी निर्भयाच्या आईंचे काँग्रेसमध्ये स्वागत आहे, अशा आशयाचे ट्विट केल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता त्यांनी स्वतःच पुढे येत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. तर, आरोपी पवन याने उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे, तिहार तुरूंग प्रशासनाने दिल्ली सरकारला या आरोपींच्या फाशीची नेमकी तारीख निश्चित करुन ती कळवण्याबाबत पत्र लिहिले आहे.
हेही वाचा : पवन जल्लाद म्हणतो.. निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकविताना मला आनंद होईल