नवी दिल्ली -निर्भया प्रकरणातील आरोपींना शिक्षा देण्यासाठी दिल्लीमधील न्यायालयाने नवी तारीख जाहीर केली आहे. आरोपींना आता एक फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना निर्भयाच्या आई म्हणाल्या, की आरोपींना जे हवे होते तेच होत आहे. तारखेवर तारखा पुढे जात आहेत. आपल्या देशातील व्यवस्थाच अशी आहे, की आरोपींचेच म्हणणे ऐकून घेतले जाते.
निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी आज (शुक्रवार) फेटाळली. त्यानंतर या आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे तिहार तुरूंग प्रशासनाने दिल्ली सरकारला फाशीच्या शिक्षेबाबत तारीख आणि वेळ निश्चित करण्याची मागणी केली. दिल्ली न्यायालयाने आरोपी मुकेशला आपली दया याचिका फेटाळली गेल्याची माहिती मिळाली आहे का, हे नक्की करण्यासाठी तुरूंग प्रशासनाला वेळ दिला. ते नक्की झाल्यानंतरच फाशीची वेळ आणि तारीख नक्की करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार तिहार तुरूंग प्रशासनाने आरोपी मुकेशला त्याची दया याचिका फेटाळली गेल्याचे सांगितले असल्याचे स्पष्ट केल्यानंतर दिल्ली न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. त्यानुसार आता एक फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता या आरोपींना फाशी होणार आहे.