नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील आरोपींचे वकील ए. पी. सिंह यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एक फेब्रुवारीला होणाऱ्या फाशीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी असे आरोपींच्या वकिलांचे म्हणणे आहे.
दिल्ली तुरुंग प्रशासनाच्या नियमानुसार, एकाच प्रकरणात दोषी असलेल्या सर्व आरोपींना शिक्षा निश्चित झाल्यानंतर, आणि त्यांचे सुटकेचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाल्यानंतरच सर्वांना फाशीची शिक्षा देता येते. यामधील एकाही आरोपीबाबत निर्णय बाकी असेल, तर इतरांनाही फाशी देता येत नाही. या नियमाचा हवाला देत, सिंह यांनी एक फेब्रुवारीला होणाऱ्या शिक्षेवर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणातील आरोपी असलेल्या मुकेशचे, शिक्षेतून सवलत मिळण्याचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले आहेत. मात्र, दोषी अक्षय सिंह याच्या क्युरेटिव्ह पिटीशनवरील सुनावणी अद्याप बाकी आहे. तसेच, दोषी विनयने कालच राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सुनावणी होऊन, त्यावर निर्णय येईपर्यंत दोषींना शिक्षा देण्यात येऊ नये असे त्यांच्या वकिलांचे म्हणणे आहे.
या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह, पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, अक्षय कुमार सिंह या चौघांना १ फेब्रुवारीला फाशी होणार आहे. वारंवार दाखल होत असलेल्या याचिका पाहून निर्भयाच्या आईने नाराजी दर्शवली होती. मानवाधिकार संघटना या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
हेही वाचा : 'नरेंद्र मोदी आणि गोडसेची विचारधारा सारखीच, मात्र मोदींमध्ये हे मान्य करण्याचे धाडस नाही'