नवी दिल्ली - फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर निर्भया प्रकरणातील दोषी विनय कुमारने सर्वोच्च न्यायालयात 'क्युरेटीव्ह पिटीशन' दाखल केली आहे. दोषी विनय कुमारने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. ७ जानेवारीला न्यायालयाने चौघांविरोधात 'डेथ वॉरंट' जारी केला होता.
दोषी विनय कुमारने 'क्युरेटीव्ह पिटीशन' दाखल केल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. आरोपींचे वकील शिक्षा लागू होण्यास विलंब करत आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला होता.
आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फासावर लटकवले जाणार आहे. त्याचबरोबर, आरोपींना १४ जानेवरीपर्यंत न्यायिक साधनांचा वापर करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींचा न्यायालयात पक्ष मांडणारे वकील ए.पी. सिंह यांनी दिल्ली न्यायालयाच्या निर्वाळ्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी याचिका दाखल केली आहे.
काय आहे क्युरेटीव्ह पिटीशन?
दोषींची निकालाविरोधातील पुनर्विचारयाचिका फेटाळल्यानंतरही क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात येते. न्याय देताना पक्षपातीपणा झाला तर नाही ना, हे तपासण्याचा शेवटचा मार्ग क्युरेटीव्ह पिटीशन आहे. दोषींना शिक्षा देतानाच न्यायिक तत्वांचे, न्यायिक प्रक्रियेचे उल्लंघन होऊ नये, म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार क्युरेटीव्ह पिटीशन दाखल करण्यात येते.
काय आहे निर्भया प्रकरण?
पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली 'निर्भया' आणि तिचा इंजिनिअर मित्र दिल्लीतील एका मॉलमधून 'लाईफ ऑफ पाय' सिनेमा पाहून परतत होते. निर्भया आणि तिच्या मित्राला द्वारकाला पोहोचायचे होते. दोघेही द्वारकाला जाणाऱ्या एका बसमध्ये मुनारिकाहून चढले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बसचा प्रवास सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करयाला सुरूवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने हस्तक्षेप केला. मात्र, आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो बेशुद्ध पडला.
यानंतर त्या सहा जणांनी बसमध्येच निर्भयावर बलात्कार केला. ते नराधम केवळ बलात्कार करून थांबले नाहीत, तर तिला अमानुष मारहाण केली आणि गंभीररीत्या जखमीही केले. नराधनांमी तिच्या शरीराचा आत्यंतिक छळ केला. त्यातील एकाने गंजलेली लोखंडी रॉड निर्भयाच्या गुप्तांगात घुसवली. या कृत्यामुळे निर्भयाच्या शरीरातील आतडी बाहेर आली. शरीरावर अमाप जखमांनी मृत्यूशी झुंज देत निर्भया रक्ताने माखली होती. त्यानंतर आरोपींनी निर्भयासह तिच्या मित्राला नग्न केले आणि दिल्लीतील वसंत विहारजवळ चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिले.
आरोपींनी दोघांना बसमधून बाहेर फेकले, त्यावेळी बसने चिरडून टाकण्याचाही प्रयत्नही केला. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या त्या दोघांनी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना केली. मात्र सुरुवातीला कोणीच थांबले नाही. त्यानंतर रात्री एका अज्ञात व्यक्तीने पोलीस स्टेशनला फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर पुढच्या काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 10.55 वाजता निर्भया आणि तिच्या मित्राला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
देशभरात संतापाची लाट... लोकांची सरकारकडे न्यायाची मागणी...
दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देशातील तळागाळातील लोकांपर्यंत ही घटना पोहोचली. यानंतर लोक रस्त्यावर उतरले. निर्भयासोबत झालेल्या घटनेने प्रत्येक देशवासियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आरोपींना अटक करण्याची मागणी तीव्र होऊ लागली. 18 डिसेंबरला देशाच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. निर्भयाच्या बलात्काऱ्यांना मृत्यूदंड देण्याची खासदारांनी मागणी केली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तसे आश्वासन दिले.
पोलिसांनी अखेर नराधमांच्या मुसक्या आवळल्या...
निर्भयाच्या गुन्हेगारांना पकडण्याची मागणी जोर धरत होती आणि देशभरातील आवाज वाढत होता. देशभर ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे होत होते. परिणामी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत गेला. त्यानंतर आठवड्याभरातच दिल्ली पोलिसांनी या कृत्यातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 17 डिसेंबर रोजी मुख्य आरोपी असलेला बसचा चालक राम सिंहसह तिघांना अटक करण्यात आली. त्यानंतर 21-22 डिसेंबरला इतर तीन आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये चालकाचा भाऊ मुकेश सिंह, जिम इंस्ट्रक्टर विनय शर्मा, फळ विक्रेता पवन गुप्ता, बस हेल्पर अक्षय कुमार सिंह आणि एका अल्पवयीन (वय 17 वर्षे) आरोपीचा समावेश होता.
या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने जेलमध्येच आत्महत्या केली. निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवले होते.
निर्भयाची मृत्यूसोबतची झुंज अपयशी...
त्या दिवसांपासूनच निर्भया मृत्यूशी झुंज देत होती. तिची स्थिती अतिशय नाजूक होत चालली होती. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. निर्भयाची प्रकृती आणखी खालावत असल्याने, अखेर तिला सिंगापूरमधील माऊंट एलिजाबेथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सिंगापूरमध्येच उपचारादरम्यान २९ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयाने अखेरचा श्वास घेतला. त्याच दिवशी निर्भयाचा मृतदेह भारतात आणण्यात आला. निर्भयाच्या मृत्यूनंतर देशभरातील लोकांचा संताप आणखी वाढला. आंदोलनांने आक्रमक रूप धारण केले. आरोपींच्या शिक्षेसाठीची मागणी तीव्र झाली. आज सात वर्षांनंतर त्या नराधमांना न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. येत्या 22 जानेवारीला या शिक्षेची अंमलबजावणी होईल. मात्र, क्युरेटिव्ह पिटीशनने पुन्हा कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे.