नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्लीतील पटियाळा न्यायालयाने चारही आरोपीं विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. त्यानुसार २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाणार आहे. देशभरातून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत होत असून निर्भयाच्या आईसह दिल्ली सामुहीक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांनीही उशिरा न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.
हेही वाचा - BREAKING... निर्भया प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी
निर्णयाचे स्वागत -
निर्भयाची आई आशा देवी यानी दिल्ली न्यायालयाच्या निकालांवर समाधान व्यक्त केले आहे. माझा मुलीला न्याय मिळाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशातील महिलांना हिम्मत मिळेल आणि त्यांचे न्यायीक प्रक्रियेवर विश्वास टिकून राहील, अशी भावना निर्भयाची आई आशा देवी यांनी व्यक्त केली.
सुष्मिता देव (काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा) - निर्भयाला न्याय मिळाला. मात्र, बलात्कार सारख्या गुन्ह्यामध्ये जर सात वर्षानंतर न्याय मिळत असेल तर, अशा इतर प्रकरणांमध्ये ज्यात ठोस पुरावा मिळत नाही त्या पीडितांनी काय करायचं? आपल्या व्यवस्थेने याकडे लक्ष देणं फार गरजेचे आहे.
बद्रिनाथ सिंग - "मला फार आनंद झाला असून न्यायालयाचा आभारी आहे. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारांमध्ये भिती निर्माण होऊन ते धडा घेतील." अशी प्रतिक्रिया 2012 मधील बलात्कार पीडितेच्या वडिलांनी दिली आहे.
स्वाती मळीवाल -"न्यायालयाच्या निर्णायचे स्वागत करते. हा विजय देशातील सर्व निर्भयांचा असून, सात वर्षे वाट पाहणाऱ्या निर्भयाच्या पालकांना मी सलाम करते. मात्र, हीच शिक्षा लवकर का दिली नाही? हा प्रश्न कायम आहे." अशी प्रतिक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मळीवाल यांनी दिली.