नवी दिल्ली- निर्भया प्रकरणी शिक्षा जाहीर झालेल्या आरोपींची फाशी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. दिल्लीतील एका न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी पवनने आज (सोमवार) राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केल्यामुळे, या चौघांनाही उद्या होणारी फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.
आपली संपूर्ण व्यवस्थाच गुन्हेगारांचे समर्थन करते - निर्भयाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया..
न्यायालयाने चौथ्यांदा आरोपींची याचिका फेटाळल्यामुळे, आपली संपूर्ण व्यवस्थाच गुन्हेगारांची समर्थन करणारी आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे. न्यायालय स्वतःच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई का करत आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. वारंवार गुन्हेगारांची टळणारी फाशी हा आपल्या व्यवस्थेचा पराभव असल्याचे त्या यावेळी म्हटल्या.
याआधी क्युरेटिव याचिका आणि दया याचिका दाखल करण्यास केलेल्या दिरंगाईमुळे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पवनच्या वकीलांना खडसावले. आज सकाळीच, सर्वोच्च न्यायालयाने पवनची क्युरेटिव याचिका फेटाळली होती.