नवी दिल्ली -राष्ट्रीय हेल्थ मिशनमधील डॉ. जावेद अली यांचा दिल्ली सरकारने कोरोना वॉरिअर म्हणून सन्मान केला आहे. अली यांचा कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देणार असल्याचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी जाहीर केले आहे.
'कोरोना वॉरिअर' डॉ. अली यांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारकडून 1 कोटींची मदत पहिल्या फळीतील कोरोना योद्धे डॉ. जावेद अली(42) राष्ट्रीय हेल्थ मिशनमध्ये कार्यरत होते. मात्र, त्यांना कोरोना झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या पत्नीने सरकारकडे मदत मागितली होती.
'डॉ. जावेद अली दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय हेल्थ मिशनमध्ये कार्यरत होते. कोरोना संसर्गाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना कोरोना वॉरिअरचा किताब देण्यात येईल, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. दिल्ली सरकार त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत देईल, असे ट्विट आरोग्य मंत्री जैन यांनी केले आहे.
डॉ. अली यांना न्याय मिळावा म्हणून एम्स रुग्णालयातील सहाय्यक प्राध्य़ापक डॉ. अमरिंदर एस मलिही यांनी अभियान राबवले होते. सरकारच्या निर्णयावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, डॉ. अली यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिल्लीमध्ये अनेक कोरोना वॉरिअर्सला कोरोनाची लागण झाली आहे. ज्या कोरोना वॉरियर्सचा मृत्यू होईल, त्यांना 1 कोटी मदत देण्याचे दिल्ली सरकारने जाहीर केले आहे.