नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा आलेख कसा असेल, हे समजण्यासाठी पुढचे तीन महिने महत्वाचे असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे. आगामी सण आणि हिवाळ्यात जर आपण कोविड नियमांचे पालन केले तर कोरोनाशी लढा देण्यात भारत भक्कम स्थितीत असेल असे हर्षवर्धन म्हणाले.
आरोग्य मंत्र्यांनी उत्तरप्रदेश राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग सारखे सोपे उपाय उत्तरप्रदेश राज्यात उपयोगी ठरू शकतात. सणासुदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी हे नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशात ९५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची दररोज नोंद होत होती. मात्र, आता सुमारे ५५ हजार रुग्ण सापडत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर देशात ९० टक्के झाला आहे. मृत्यू दरही कमी झाला आहे. सध्या मृत्यू दर १.५१ असून तो १ टक्क्याच्या खाली जाण्याच्या मार्गावर आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांपेक्षा कमी असल्याचे ते म्हणाले.
हिवाळ्यात राजधानी दिल्लीसह अनेक शहरात प्रदुषणाची स्थिती गंभीर होते. तसेच या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दसरा दिवाळी तोंडावर असताना बाजारांमधील गर्दीही वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. नुकतेच पंतप्रधान मोदींनी 'बेफिकरी नको' असा संदेश देशवासियांना दिला.