नवी दिल्ली :भारतीय निवडणूक आयोगाचे नवनिर्वाचित आयुक्त राजीव कुमार यांचे गुरुवारी औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनिव अरोरा, तसेच निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे उपस्थित होते. यासोबतच आयोगाचे सरचिटणीस उमेश सिन्हा, आणि आयोगातील इतर अधिकारीही उपस्थित होते.
यावेळी बोलताना अरोरा यांनी राजीव कुमार यांच्या बँकिंग, वित्त आणि इतर विभागांमधील योगदानाबाबत सांगितले. तसेच, त्यांच्या अनुभवाचा आणि विशेष अशा कार्यपद्धतीचा निवडणूक आयोगाला नक्कीच फायदा होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तर, ही संधी मिळाली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो असे मत यावेळी कुमार यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्यकारभाराचा भाग असणाऱ्या संस्थांचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच, आपल्याला मिळालेल्या या संधीचा आयोगासाठी पुरेपूर उपयोग करुन देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कुमार हे १९८४च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी राजीनामा दिल्यानंतर कुमार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. ते पुढील पाच वर्षांसाठी या पदावर कार्यरत असतील. आपल्या ३६ वर्षांच्या कार्यकाळात कुमार यांनी केंद्राच्या विविध विभागांमध्ये काम केले आहे. यासोबतच, त्यांनी झारखंड आणि बिहारमध्येही काम केले आहे. बिहारमधील आपल्या कामाचा त्यांना नक्कीच पुढील बिहार निवडणुकांसाठी उपयोग होईल.
हेही वाचा :भारतातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर