पाटणा - बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील 71 जागेसाठी मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील 94 जागांवर मतदान होणार आहे. एकूण 1 हजार 463 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये महागठबंधनची सर्वांत मोठी परिक्षा आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचेही भाग्य ठरणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील महागठबंधनमध्ये आरजेडी 56, काँग्रेस 24, आणि डावे पक्ष 14 जागांवर लढणार आहे. तर एनडीएत भाजपा 46 तर जेडीयू 43 व्हीआयपी पक्षांचे 5 उमेदवार रिंगणात आहेत. तर लोकजन शक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी 52 उमेदवार उभे केले आहेत. यात जेडीयू विरोधात 43 जण निवडणूक लढवत आहेत. तर बीएसपीने 33 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
भाजपा आणि आरजेडी 27 जागांवर समोरासमोर आहेत. तर 12 जागांवर भाजपा काँग्रेसविरोधात आहे. 2015च्या निवडणुकांमध्ये आरजेडी-जेडीयू-काँग्रेसने मिळून 70 जागांवर विजय मिळवला होता. यात 33 आरजेडी, 30 जेडीयू आणि 7 जागा काँग्रेसने मिळवल्या होत्या. तर भाजपाने 20 आणि लोजपाने 2 जागांवर विजय मिळवला होता.
तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांची परीक्षा -
दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात नितिश कुमार यांचे तीन मंत्री रिंगणात आहेत. तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून तर त्यांचे मोठे भाऊ आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव हसनपूरमधून निवडणूक लढवत आहेत. आरजेडीचे प्रधान सरचिटणीस आलोक कुमार मेहता उजियारपूर तर माजी खासदार आणि युवा आरजेडी अध्यक्ष शैलेश कुमार उर्फ बुलो मंडल बिहपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. दुसर्या टप्प्यात 146 महिला उमेदवार रिंगणात आहेत तर पहिल्या टप्प्यात 114 महिला उमेदवार निवडणूक लढवत होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील 1463 उमेदवारांपैकी 1316 पुरुष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
दुसऱ्या टप्प्यात 2 कोटी 86 लाख 11 हजार 164 करणार मतदान -
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने दुसर्या टप्प्यातील 17 जिल्ह्यांमधील 94 जागांवर मतदान करण्यासाठी 41,403 ईव्हीएम (बॅलेट युनिट) वापरल्या जातील. या व्यतिरिक्त, 41,362 नियंत्रण युनिट आणि 41,362 व्हीव्हीपॅट यंत्र वापरले जातील. दुसर्या टप्प्यातील निवडणुकांसाठी संबंधित जिल्ह्यात 41 हजार 362 मतदान केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या टप्प्यात 2 कोटी 86 लाख 11 हजार 164 मतदार मतदान करतील. यामध्ये 1 कोटी 50 लाख 33 हजार 34 पुरुष तर 1 कोटी 35 लाख 16 हजार 271 महिला आणि तृतीयपंथीय 980 मतदारांचा समावेश आहे.