हैदराबाद :कोरोना महामारी, त्यात नवा स्ट्रेन हे सर्व सुरू असतानाच आता आणखी एका विषाणूने तोंड वर काढले आहे. देशातील कित्येक राज्यांमध्ये एव्हिअन इन्फ्लुएंझा या विषाणूने थैमान घातले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि केरळमध्ये यामुळे हजारो पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे हा विषाणू पसरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विषाणूचा मानवांना धोका नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, हा नवा स्ट्रेन असल्यामुळे पुढे काहीही होऊ नये यासाठी विशेष खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
राजस्थानमध्ये समोर आले पहिले प्रकरण..
२५ डिसेंबरपासूनच राजस्थानच्या झालावाडमध्ये कावळ्यांच्या मृत्यूचे प्रकार समोर येऊ लागले होते. पुढे आठवडाभरातच जिल्ह्यातील शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने एक किलोमीटरचा परिसर सील केला होता. तसेच, जिल्ह्यातील अंड्यांची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, यानंतर जिल्हाधिकारी निकया गोहाएन यांनी त्वरीत एका कारवाई समितीची स्थापना केली होती.
राजस्थानपाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये प्रसार..
राजस्थानपाठोपाठ मध्य प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या मृत कावळ्यांची तपासणी करण्यात आली असता, त्यांनाही बर्ड-फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. इंदूर, मंडसौर, देवस, उज्जैन आणि अगर जिल्ह्यांमध्ये असे प्रकार दिसून आले. त्यांपैकी इंदूर आणि मंडसौरमधील कावळ्यांच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, इतर जिल्ह्यातील अहवाल मिळणे बाकी आहे.
हिमाचलमध्ये हजारो स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू..
हिमाचल प्रदेशात 'बर्ड फ्लू' आजाराचा प्रसार होत असून आत्तापर्यंत सतराशेपेक्षा जास्त स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू झाला आहे. कांडगा जिल्ह्यातील पौंग धरणक्षेत्रात स्थलांतरीत पक्षांचा मृत्यू झाला असून प्रशासन सतर्क झाले आहे. धरणक्षेत्रात आणि शेजारील चार मतदार संघात मटन,अंडी, मासे विक्रीला प्रशासनाने बंदी आणली आहे.
प्रशासनाने बर्ड फ्लूच्या भीतीने धरणच्या १० कि. मी परिसरात सर्व व्यवहारांवर बंदी आणली आहे. नागरिकांनी त्यांच्याजवळील जनावरांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.