नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. लस बनविण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता पीएनबी व्हेस्पर लाइफ सायन्स या कंपनीला कोरोनावरील औषधाची मानवी चाचणी घेण्याची परवानगी औषध महानियंत्रक कार्यालयाने (DCGI) दिली आहे. त्यामुळे कंपनी आता कोरोना रुग्णांवर औषधाची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करणार आहे.
या महत्त्वाच्या यशानंतर कंपनीचे कार्यकारी अधिकारी पी. एन. बलराम माध्यमांशी बोलताना म्हणाले, कोरोना विरोधातील लढ्यातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. औषधाच्या मोल्याक्युलमधून चांगले निकाल समोर आले आहेत. या औषधामुळे फुफ्फुसाची सूज आणि श्वसनातील त्रास कमी होत असल्याचे दिसले आहे.
पीएनबी व्हेस्पर लाइफ सायन्स ही भारतीय औषधनिर्मिती कंपनी आहे. 'पीएन-००१-बालाडोल' हे औषध कंपनीने तयार केले आहे. हे औषध चाचण्यांत यशस्वी ठरले, तर कोरोनावर उपचार करण्यासाठीचे हे पहिले औषध असेल, असा दावा कंपनीने केला आहे. क्लिनिकल चाचण्यांच्या आधीच्या चाचण्यांत औषधाचे निकाल सकारात्मक आहे आहेत.
औषध चाचणीचा दुसरा टप्पा आता बीजे मेडीकल कॉलेज, पुणे येथे होणार आहे. ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या ४० रुग्णांवर ६० दिवसांच्या आत चाचणी होणार आहे. ताप, अंगदुखी, फुफ्फासाला सूज हे कोरोनाची महत्वाची लक्षणे आहेत. क्लिनिकल चाचण्यांच्या आधीच्या चाचण्यात (प्री-क्लिनिकल ट्रायल) ताप, अंगदुखी, सूज कमी करण्यात औषध यशस्वी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.