नवी दिल्ली - गेल्या वर्षीपासून राफेल विमान हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. मंगळवारी बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित असे राफेल फ्रान्स सरकारने भारताला सुपुर्द केले. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. मात्र, राफेलच्या या पूजनामुळे नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर हवाईदलप्रमुख राफेल लढाऊ विमानाच्या हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. यावेळी राजनाथ सिंह यांनी राफेलमधून उड्डाण करण्यापूर्वी त्याची शस्त्रपूजा करत ओम लिहिले. त्यानंतर विमानाला फुले आणि श्रीफळ वाहिले. याचबरोबर चाकाखाली लिंबू ठेवले होते. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे.