नवी दिल्ली - सध्या भारत-नेपाळ सीमेवर तणाव आहे. यातच नेपाळने भारत-नेपाळ सीमेवरील वाल्मिकिनगर गंडकराज परिसरात अतिरिक्त पोस्ट उभारल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात येता, सीमेवर भारतीय सैन्यदलाकडून दक्षता वाढवण्यात आली आहे.
नेपाळ पोलीस आणि सशस्त्र दलांना जुनी शस्त्रास्त्रे बदलून चिनी आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळा देण्यात आल्याची माहिती नेपाळमधील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. लॉकडाऊनमुळे भारत-नेपाळ सीमा सीलबंद करण्यात आल्या आहेत. सुनौली आणि महेशपूर सिमेवर नेपाळने तंबू उभारले आहेत. त्या तंबूवरील चिन्हे विदेशी भाषेत नमूद करण्यात आलेली आहेत.
पश्चिम चंपारणच्या गंडकराज परिसरात नेपाळने उभारले तंबू लष्करी चर्चेनंतर नेपाळने भारतीय सीमेवरील पंथोला गावात बांधलेला तात्पुरता कॅम्प हटवला आहे. लॉकडाऊन दरम्यान सरीसावा नदीच्या दुसर्या बाजूला कॅम्प उभारण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते.
दरम्यान, सिमेवर तणाव असल्याने आसपासच्या खेड्यात राहणाऱया स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीमावादामुळे त्यांच्या व्यवसायाचे भविष्य अनिश्चित असल्याने व्यापारी नाराज आहेत. एका नवीन नकाशावरून नेपाळ आणि भारतादरम्यान तणाव निर्माण झाला आहे. नेपाळने काही दिवसांपूर्वी हा राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला होता. ज्यात नेपाळने भारतीय प्रदेशांवर दावा केला होता.