पश्चिम चंपारन - भारत आणि नेपाळमधील वादाचे पडसाद आता सीमेवर दिसायला लागले आहेत. नेपाळने बिखाना थोरी या रेल्वेस्थानकाजवळील पाण्याचे कालवे बंद केले आहेत. त्यामुळे या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ प्रशासनाने हे कालवे दगड आणि माती टाकून बंद केले आहेत. त्यामुळे नेपाळमधून येणारे पाणी पूर्णपणे थांबले आहे. इथल्या लोकांसाठी, शेतीसाठी हे दोन कालवेच पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. जवळपास सात गावांना आणि हजार एकर जमीनीला याचा फटका बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच भारतातील अधिकाऱ्यांनी नेपाळमधील अधिकाऱ्यांशी बोलणी करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेपाळचे सशस्त्र सीमा गस्त अधिकारी दीपक दाल यांनी हे कालवे पुन्हा सुरू करण्यास नकार दिला. आम्ही पुलाच्या बांधकामासाठी हा कालवा बंद केला आहे. एका कालव्यातून पाणी सुरू आहे. भारताला हवे असल्यास त्याच्या मदतीने दुसरा कालवा ते तयार करू शकतात, असे दाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाणी सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
हेही वाचा :बाबरी मशीद प्रकरण : लखनऊ विशेष न्यायालय नोंदवणार ३२ आरोपींचे जवाब..