पिथोरागड -भारताचा भूप्रदेश नेपाळच्या नकाशात समावेश करण्याचा कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी सीमेवरील कालापाणी परिसराची पाहणी केली. नेपाळने भारताच्या हद्दीतील लिपूलेक, कालापाणी आणि लिंपियाधूरा प्रदेश त्यांच्या नकाशात दाखवले आहेत. यानंतर सीमेवरील हालचाली वाढल्या आहेत.
बुधवारी नेपाळचे लष्कर प्रमुख पुरन चंद्रा थापा आणि नेपाळ आर्मड फोर्सेसचे महासंचालक शैलेंद्र सवानल यांनी कालापाणी परिसरातील दारचूला भागातील लष्करी चौकीला भेट दिली. नुकतेच नव्याने तयार करण्यात आलेल्या चांग्रु चौकीचीही पाहणी नेपाळने केली. परिसराची पाहणी केल्यानंतर या भागाचा हवाई सर्व्हे केला. दोन्ही देशांमध्ये सीमा वाद सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच नेपाळच्या लष्करप्रमुखांनी विवादीत भागाचा दौरा केला.
नेपाळच्या लष्करप्रमुखांच्या भेटीमुळे भारतीयांच्या भुवया उंचावल्या आहेत. लिपूलेक, कालापाणी आणि लिंपियाधुरा भागावर नेपाळने दावा सांगितल्यानंतर या परिसरातील सुरक्षाही वाढवली आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सीमा सुरक्षा बलाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली असून कालापाणी नदीवर जवान लक्ष ठेवून आहेत.