नवी दिल्ली- काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 73 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशाला अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावच्या विरोधात उभे ठाकावे लागेल, असे म्हटले आहे.
सोनिया यांनी अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताच्या परंपरेवर भाष्य केले. भारत हा सत्य, अहिंसा, करुणा आणि देशभक्तीच्या सिद्धांतावर चालणारा देश आहे. येथे कट्टरता, अंधविश्वास, संप्रदायवाद, जातीवाद, असहिष्णुता अशा गोष्टींना अजिबात थारा नाही. देशाला अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावच्या विरोधात एक राष्ट्र म्हणून उभे ठाकावे लागेल जेणेकरुन आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळेल, असे त्या म्हणाल्या.